Monday, April 30, 2012माछेर झोल

बंगाली माणसाचे आणि माशाचे समीकरण सर्वश्रुत आहे. माछेर झोल म्हणजे माशाचा रस्सा. हा रस्सा आणि भात असला कि बंगाली माणूस तृप्तीने जेवतो आणि पोटापासून आशीर्वाद देतो.. अगदी अनुभवाचे बोल आहेत हो ! रोजच्या जेवणातला हा प्रकार करून पाहायचा असेल तर तुम्हाला लागेल...


साहित्य:
राहू मासा – ४/५ तुकडे
सरसो तेल – तळणीपुरते
हळद – १/४ चमचा
मीठ – चवीनुसार
आले – १/२ इंच
जिरा – १  चमचा
धने पावडर – १/२ चमचा
साखर – १/४ चमचा
तिखट – १/२ चमचा
हिरव्या मिरच्या - १-२ 
काला जिरा – १/२ चमचा
लाल मिरची – १/२ चमचा
टोमेटो – १ (बारीक चिरून)
बटाटा – १ मध्यम
ऑप्शनल भाज्या -
फ्लॉवर – ४ फुले
बीन्स – ६ -८
वांगी – १ लहान
कृती:
मासा चांगला धुवून त्याच्या तुकड्यांना हळद मीठ चोळून ठेवावे. थोड्या वेळाने सरसो तेलात तांबूस तळून घ्यावे व बाजूला काठून ठेवावे. आले+जिरा+ धने पावडर+ तिखट बारीक वाटून पेस्ट करून घ्यावी. बटाटे (व हवे असेल तर इतर भाज्यांना) धुवून पातळ उभे काप करून घ्यावे. कढईत तेल गरम करून  बटाट्याचे काप / भाज्या थोड्या परतून घ्याव्या व एका बाजूला काठून ठेवाव्या . उरलेल्या तेलात काला जिरा  व हिरव्या मिरच्या फोडणीस द्याव्या. मग त्यात  मसाल्याची पेस्ट  व चवीनुसार साखर मीठ घालावे.  थोडेसे  परतावे व मग पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. नंतर त्यात परतलेल्या भाज्या व माशांचे तुकडे घालावे व व्यवस्थित शिजू द्यावे. हा रोजच्या खाण्यातला प्रकार असल्यामुळे रस्सा हलकाच हवा फार मसालेदार नको. बाकी  भाज्या घालणे ऑप्शनल असले तरी  बटाट्यांचे काप मात्र नक्की हवेतच. पण बाकी भाज्यांमुळे रस्स्याची चव नक्कीच वाढते. हवी तर थोडी कोथिंबीर घालून गर्निश ही करू शकता आणि रोहू माशा ऐवजी तुमच्या आवडीचा दुसरा कोणताही मासा घालून करू शकता हा रस्सा. हा पातळ पण चवदार रस्सा करून पहाणार ना ?

Monday, April 23, 2012


टोमटो खजुरेर चटनी - टोमटो आणि खजुराची चटणी

कालचा  रविवार कसा मस्त गेला. फार दिवसांनी माझ्या शाळेतल्या बाल मैत्रिणींचा अड्डा माझ्या घरी जमला आणि त्या कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी ना उजाळा देत दुपार कशी अलगद सरली ते कुणालाच कळले नाही. असे हास्याचे फवारे आणि चुटकुल्यांची कारंजी उडत होती कि अगदी पोटात कावळे कोकलायला लागेस्तोवर दुपारच्या जेवणाचीही शुद्ध नव्हती - !

जेवताना साहजिकच " हे कसे केलेस" "ते कसे केलेस" आणि "मराठी- बंगाली जेवणातील फरक" वगैरे चर्चा झाल्याच.  टोमटो आणि खजुराच्या चटणीचा तर बघता बघता फडशा पडला – खरं तर थोडी कमीच पडली म्हणाना ....एवढी ती सगळ्यांना आवडेल असे वाटले नव्हते मला. 

मराठी जेवणातल्या तिखट चटण्या साधारणपणे तोंडी लावणे म्हणून खाल्ल्या जातात. तोंडाला आणि जेवणाला कशी झणझणीत चव आणतात त्या! पण आंबट – गोड चवीची ही बंगाली टोमटो आणि खजुराची चटणी नेहमी जेवणाच्या शेवटी खातात आणि ही चटणी तोंडात एक छानसा स्वाद ठेवून जाते. करायला सोपी आणि खायला मस्त ही चटणी कशी करायची हे तेव्हा सगळ्यांनी विचारले आणि मी सांगितले खरे.पण ऐन वेळी करताना काही विसरायला होवू नये, म्हणून हा खटाटोप !

(अर्थात कोण ही चटणी स्वतः करून बघायचा खटाटोप करेल आणि कोण “पुढच्या  वेळी भेटू तेव्हा नक्की करून आण ग!” म्हणेल हे काय मला माहित नाही?)साहित्य:
५-६ लाल पिकलेले टोमटो
८-१०- खजूर ( बिया काढलेले व तुकडे केलेले )
१ चमचा – मीठ ( चवीप्रमाणे)
२-३ चमचे साखर ( आवडीप्रमाणे)
१/ ४  इंच आले  – बारीक किसलेले
१-२ लाल सुक्या मिरच्या
१/२ चमचा – हळद
१/२ चमचा – बंगाली पांच फोडन ( मोहरी + जिरे + मेथी + बडीशेप + कलोन्जी- सम प्रमाणात )
१ चमचा – तेल
काजू – किस मिस आवडीप्रमाणे

कृती:
·         टोमटो धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत
·         कढईत तेल गरम करून त्यात पाच फोडन टाकावी.
·         ती तडतडली कि सुक्या मिरच्या घालाव्यात.
·         मग टोमटोचे तुकडे घालावे. एकदा परतून घेऊन खजुराचे तुकडे घालावे.
·         थोडे परतले कि हळद मीठ- साखर, आल्याचा किस घालून झाकण ठेवावे.
·         पाणी सुटेल. मधून मधून झाकण काढून हलवीत रहावे.
·         पूर्ण शिजून टोमटो- खजूर मिळून आले कि आवडीप्रमाणे काजू - किसमिस घालून उतरवावे.
·         थंड झाले कि सर्व्ह करावे.

Thursday, April 19, 2012


आलू पोटोलेर झोल - बटाटा पोटोलचा रस्सा 

मी आज निरामिष (म्हणजे कांदा -लसुण न वापरता)  आलू पोटोलेर झोल केला होता. पोटोल ही भाजी महाराष्ट्रात फारशी दिसत नाही आणि म्हणूनच कि स्वयंपाकात वापरली जात नाही. निदान मला तरी माहित नाही. यु पी , एम पी , बिहार , ओरिसा , बंगाल या आणि अशा मध्य आणि पूर्व भारतात मात्र ही भाजी फार आवडीने खातात - विशेषतः उन्हाळ्यात! पोटोल चे इंग्रजी नाव -  stripe guard  आणि ते नाव योग्यच आहे कारण यावर उभे पट्टे( stripes ) असतात.  
या भाजीत विटामिन अ, क तसेच माग्नेशियाम, पोटशियाम अशी अनेक प्रकारची खनिजे असतात. लो कलरी असणारी  भाजी वेगवेगळ्या पध्दतिने केली जाते.  बंगाली पद्धतीनुसार बरेचदा त्यात बटाटे ही घातले जातात. -   आलू पोटोलेर झोल, पोटोल भाजा, पोतोलेर दालना, पोतोलेर दोल्मा, पोटोल भोरे ,पोटोल  भाते......  या आणि अशा रेसिपीज नंतर पाहूया . आजच्या आलू पोटोलेर झोल म्हणजे – बटाटा – पोटोलच्या  रश्याची रेसीपी अशी.

साहित्य

२/ ३  चमचे – तेल
१/२ हिरव्या मिरच्या
१/२ –तमालपत्रे
१/४  किलो पोटोल
२ बटाटे
१ टोमटो
१/२ चमचा – हळद
१ चमचा – काश्मिरी तिखट
१ चमचा – जीरा पावडर
१ चमचा – धणे पावडर
१ चमचा आले बारीक वाटलेले
१/२ चमचा – गूळ/ साखर
१/ २ चमचा गरम मसाला
पाणी गरजेनुसार
मीठ चवीनुसार
कोथिंबीर –सजविण्यासाठी

कृती

बटाटे आणि पोटोल स्वच्छ धुवून घ्यावेत. बटाट्याची साले काढून त्याचे तुकडे करून घ्यावेत. पोटोल ची साले पूर्ण काढू नयेत, अर्धी ठेवावीत व खालील चित्रात दिल्याप्रमाणे तुकडे करून घ्यावेत. पोटोलच्या बिया आवडत असतील तर ठेवाव्या नाहीतर काढून टाकाव्या.


एका कढईत तेल गरम करावे . त्यात हे तुकडे घालून तपकिरी रंगावर बोटचेपे होईतोवर परतून घेऊन बाजूला काढून ठेवावे.
वाटलेले आले- जीरा- धणे पावडरी , हळद, तिखट, एकत्र करून त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट करून ठेवावी.  कढईत उरलेल्या तेलात तमालपत्र घालावे  व त्यानंतर ही पेस्ट घालून परतावे. टोमटोचे बारीक काप करून  तेही कढईत घालावे व पुन्हा  चांगले परतावे. थोडे थोडे तेल सुटू लागले कि त्यात परतलेल्या पोटोल – बटाट्याचे तुकडे घालावे व झाकावे. एक वाफ आली कि गरजेनुसार मीठ – साखर व पाणी घालावे  व पुन्हा झाकून थोडे  शिजू द्यावे. व्यवस्थित शिजले कि गरम मसाला घालून उतरवावे व कोथिंबीर भुरभुरवून खावयास घ्यावे.


बंगाली लोक भाताबरोबर खातात पण मी  पोळीबरोबरही खाते. तुम्ही दोन्ही ट्राय करून बघायला हरकत नाही.

Wednesday, April 18, 2012


   पश्चिमेकडून -------------------------------------------------------पूर्वेकडे                                                    
महाराष्ट्र पश्चिमें कडचे प्रगत राज्य तर पश्चिम  बंगाल भारताच्या पूर्वेला असलेले एक महत्वाचे राज्य. मराठी  माणूस शिवाजी महाराज,  बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करणार तर बंगाली लोक रविंद्रनाथ टागोर व सत्यजित रे यांना पूजणार. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीची धूम तर बंगाल मध्ये दुर्गा पूजाचा जल्लोष !  रशगुल्ला आणि शोन्देश साठी प्रसिद्ध  असणारे आणि साध्या ममता दीदी मुळे रोज बातम्यात असणारे हे  बंगाली !

मराठी आणि बंगाली संस्कृतीत आणि माणसात तसे बरेच साम्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील बरेचसे नेते बंगाल आणि महाराष्ट्रातूनच आलेले दिसतात. –इकडे  टिळक, आगरकर, सावरकर वगेरे आणि नेताजी, बिपिंनचंद्र पाल, खुदीराम बोस आणि इतर.  दोघांनाही नाटक, संगीत, नृत्याची आवड असते. इकडे छबिल्दास, लागू, पालेकर वगेरे  आणि तिकडे शंभू मित्रा, अपर्णा सेन,वगेरे! दोन्हीकडे शिक्षणाला अतिशय महत्व देतात. मुलगा एकदा का सरकारी नोकरीत चिकटला की मायबाप धन्य होतात. धोका पत्करण्याची वृत्ती आणि पर्यायाने व्यावसायिक दोन्हीकडेही तसे कमीच. साधरणपणे दुसऱ्या संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टीकोन आदराचा - या आणि अशा बऱ्याच समान   जीवन मूल्यामुळे सासरच्या मंडळीशी जुळवून घेताना तसा फारसा त्रास झाला नाही. पण 
लग्नानंतर जेव्हा बंगाली खाद्य संस्कृतीचा परिचय झाला आणि साहजिकच  माझ्या मराठी खाद्य संस्कृतीशी त्याची तुलना झाली; तेव्हा इथे मात्र साम्यापेक्षा फरकच  ज्यास्ती जाणवले.

महाराष्ट्रात – विशेषतः ज्या घाटावर मी लहानाची मोठी झाले त्या मराठी जेवणात आणि लग्नानंतर पदरी पडलेल्या बंगाली जेवणात खुपच जास्त फरक!

खरे तर माझ्या माहेरी ही तशी थोडीफार खिचडी होतीच.कारण आई देशस्थ ब्राम्हण तर वडील कोकणी मराठा.  पण तरीही घरी मुख्यत्वे करून देशस्थ ब्राम्हणी पद्धतीचा स्वयंपाक असायचा. त्याला करणे दोन- एकतर आम्ही घाटावर राहिलो- आणि दुसरे म्हणजे माझे वडील म्हणजे टिपिकल प्रोफेसर होते. त्यांना खाण्यापिण्यात  अजिबात रस नसायचा. पुस्तके, लिखाण वाचन हे आणि  एवढेच काय ते महत्वाचे त्यामुळे  “ खाणे- पिणे हे केवळ जगण्यासाठी! ” 

"जगण्यासाठी खाणे " एवढे साधे तत्व असणाऱ्या या अशा घरातून मी “खाण्यासाठी जगणे, नव्हें, खाण्याभोवती सारा दिवस घालवणाऱ्या” घरी येवून पडले आणि सुरुवातीला अतिशय  अवघडलेली मी  हळू हळू त्यात कधी रुळले हे कळलेच नाही.

घाटावर चे ब्राम्हणी  जेवण म्हणजे मुख्यत्वे पोळी, भाकरी, आमटी, भाजी, वगेरे... भात नावापुरताच! तर पारंपारिक बंगाली जेवणात भात हा मुख्य घटक. आपण भात कसा मउ करणार तर भात शिडशिडीत नाही झाला तर बंगाली लोक  नाके मुरडणार! आपल्याकडे डाव्या बाजूला लोणची- पापड, कोशिंबीर  हवेच तर  बंगाली जेवणात त्याला फारसे महत्व नाही. लसणाचा वापरही महाराष्ट्रात ब्राम्हणी जेवणात होतो त्यापेक्षा खूप कमी. बंगाली जेवणात कांदा, जीरा , आले , याखेरीज मोहरी, खसखस यांचा ही  मसाल्यासाठी बराच वापर होतो. आपल्या पेक्षा मिश्र भाज्या खाण्याची, साली- देठ वापरण्याची  प्रथा तिकडे फारच जास्त! आपण शेंगदाणा नाहीतर करडईचे तेल वापरणार तर ह्यांना मोहरीचे तेल हवे.  दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात पोळी, भाकरी वगेरे सहसा खात नाहीत. रोटी –सब्जी खायची तर सकाळच्या नाश्यात किंवा थंडीच्या  दिवसात रात्रीच्या जेवणात. एरवी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात मुख्यत्वे करून भातच! भाता बरोबर खाण्यासाठी  साधारणपणे पाच – सहा मुख्य प्रकार असतात. आपल्याकडे बरेच शाकाहारी आढळतात पण तिकडे शाकाहारी शोधावे लागतात. निरामिष जेवण म्हणजे कांदा- लसुण न घालता केलेला शाकाहारी स्वयंपाक. बहुतेक बंगाली घरात गुरुवारी निरामिष जेवण असते. त्या व्यतिरिक्त मग पूजा अर्चा असेल किंवा इतर कारणानेही निरामिष जेवण असू शकते. पण बाकी दिवशी एका वेळेला तरी मासे हवेतच. मांसाहारातही आपल्याकडे कोंबडी – मटण जास्त प्रिय तर तिकडे कोंबडी – मटण आठवड्यातून एकदा – साधरणपणे रविवारी. रोजच्या घडीला माशांना पर्याय नाही. बरे माशांत ही फरक – आपले कोकणी लोक समुद्रातले व खाडीतले मासे खाणार तर हे बंगाली लोक नदीतले मासे शोधणार. बंगाली मासे करायला शिकण्याआधी हे लोक मासे कोणते खातात आणि ते कसे ओळखायचे ते माहित असायला हवे – त्यासंबंधी सांगेन लवकरच !

Tuesday, April 17, 2012

आलू कुम्ह्डो भाजा आर रुटी


माझ्या माहेरी लाल भोपळ्याचे फारसे प्रस्थ नव्हते. कधी काळी भोपळ्याची भाजी व्हायची नाहीतर सांडग्यात हमखास लाल भोपळा किसून घालताना आईला बघितले होते. पण इथे रोजच्या जेवणात लाल भोपळ्याचा वापर बराच. नाश्त्याच्या भाजीत, चोर्चुरीत, पाच मिशालीत ....! लाल भोपळा म्हणजे तशी गरीब भाजी- फ्लावर चा तोरा तिच्याकडे नाही. लाल भोपळा लो कालरी तर आहेच . या शिवाय ह्या भाजीत अनेक चांगले गुण आहेत- anti oxidants आहेत, ज्यामुळे शरीराला फायदा होतो.

 बघुया तर मग, रोजच्या घडीचा, साधा सुधा बंगाली नाष्ट्यातला एक प्रकार -

 आलू कुम्ह्डो भाजा आर रुटी -

 बटाटा आणि लाल भोपळ्याची परतून केलेली भाजी आणि रोटी.

 साहित्य

२ बटाटे
१/४ किलो लाल भोपळा
 २ सुक्या मिरच्या
१/२ छोटा चमचा कलोन्जी/ काळो जीरा
२ चमचे तेल
१/२ चमचा हळद,
मीठ चवीनुसार

कृती

 ब टाटे लांबट कापून घावेत.लाल भोपळ्याची साले काढून त्याचेही लांबट कप करूंन घ्यावेत. दोन्ही स्वच्छ धुवून घावेत. कढईत तेल टाकावे. ते गरम झाले कि कालोंजी आणि लाल मिरच्या फोडणीस घालाव्यात. त्या तडतडल्या मग बटाटे व लाल भोपल्याचे कप घालावेत. हळद -मीठ घालून परतावे. जास्त शिजत नाहीत याकडे लक्ष द्यावे नाहीतर लगदा होण्याची शक्यता असते. बोटचेपे झाले कि उतरावे व गरम गरम रोटी बरोरार खावयास घ्यावे.

Friday, April 13, 2012


 बंगाली नव वर्षाचे स्वागत

“एशो हे बैशाक एशो एशो”

मागच्याच महिन्यात गुढी पाडवा झाला. मस्त श्रीखंड  – पुरी, भरली वांगी चा बेत केला होता आणि सगळ्यांनी चांगलाच आडवा हात मारला होता. पण ते  खाऊन जिरतेय ना जिरतेय तोवर घरात लगेचच पुढल्या सणाची – म्हणजे त्यानिमित्ताने होणाऱ्या खाण्यापिण्याची चर्चा सुरु झालीच आणि त्यात येणारा सण म्हणजे  बंगाली नव वर्ष - पोईला बैशाक!
उद्या १४ एप्रिल - पोईला बैशाक!  पोईला म्हणजे – पहिला आणि बैशाक म्हणजे वैशाख.  मराठी नववर्ष जसे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरु होते तसे बंगाली नवीन वर्ष वैशाख महिन्याच्या पहिल्या  दिवशी सुरु होते. साधारणपणे १४ किवा १५ एप्रिल ला बंगाली नव वर्ष लागते.
माझ्या सासुबाई होत्या तोवर आमच्याकडे  पोईला बैशाक सुरु व्हायचा तो तुळशीला पाणी देवून. सकाळी लवकर उठून घराची साफ सफाई झाली कि त्या स्नान करीत व मग अल्पना – म्हणजे बंगाली रांगोळी काढीत. मग घरातल्या तुळशीवर एक घट बांधून त्यातून तुळशीवर अभिषेक करीत. पूर्ण वैशाख महिन्यात हा घट तुळशीवर बांधलेला असे. त्यानंतर मग पूर्ण सोपस्कार करून देवाची  पूजा -  त्यातही देवी लक्ष्मीला आणि गणपतीला स्पेशल मान असे. सर्वांच्या सुख समृद्धीची मनोकामना करून त्यांची पूजा संपेस्तोवर  घरातल्या सगळ्यांचे आवरून झालेले असे . मग सुरु व्हायचे वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे  व एकमेकांना “शुभ नब बर्श” म्हणून अभिनंदन करणे. बहुतेक वेळी घरात महाकवी रबिन्द्रनाथ टागोरांच्या सीडीज लावलेल्या असायच्या आणि  “एषो हे बैशाक एषो एषो!” चा आवाज घरात हळुवारपणे भरून राहायचा.
आता त्या गेल्या आणि त्याच बरोबर सगळे पूजा पाठही. मी  कधीच फारशी पूजा पाठ करणारी नव्हते , अजूनही नाही. माझा नवराही फारसा त्यातला नाही. त्यामुळे आता पोईला बैशाक साजरा होतो तो देवापुढे निरांजन – अगरबत्ती लावून व  देवाच्या पाया पडून. आणि त्याहीपेक्षा मस्त पेईकी खावून पिऊन.  शेवटी काय – देवपूजेपेक्षा पोट पूजा खरी.  पोट पूजा करण्यासाठी वेगवेगळी कारणे मिळाली कि झाले! काय म्हणता?
पोईला बैशाकला  आमच्याकडे जवळची मित्र मंडळी एकत्र येतात, गप्पा मारतात आणि हाडाच्या बंगाल्याना हे सगळे करायचे तर खाण्यापिण्याशिवाय शक्यच नाही.  पूर्वीच्या काळी या दिवशी बायका लाल काठाची पांढरी साडी आणि पुरुष मंडळी कुर्ता पायजमा घालायची. अजूनही पुरुष मंडळी ची वेश भूषा फारशी बदलेली नाही पण आता बायका मात्र केवळ लाल काठाची पांढरी साडीच नेसताना दिसत नाहीत तर  नव्या नव्या प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या नेसताना दिसतात. सुंदर सुंदर सलवार कुडते ही बरेचदा बघायला मिळतात.
या  दिवसाचा स्पेशल स्वयंपाक ही  मात्र माझी जबाबदारी – तेव्हा ही होती , अजूनही आहे. मेनू ठरवण्यासाठी कितीदा तरी चर्चा होतात आमच्याकडे. कोणत्या तरी वैश्विक महत्वाच्या गोष्टीवर करावी तशी तावातावाने पण अतिशय मनापासून होणाऱ्या या चर्चाचे मुद्दे ही तितकेच महत्वाचे असतात बरे ! म्हणजे - माछ भाजा कि माछएर चाप ? .......भापा एलिश ना दोई माछ? ......ना कि चीन्ग्डी मलाई करी? ........कोशा माग्शो ना चीकेन? .........निरामिशे – म्हणजे वेजीतेरीयन साठी  काय? ( अर्थात माझ्यासारखे एक दोन अपवाद सोडले तर बंगाली वेजिटेरीअन मिळणे कठीणच! ) मग त्यांच्यासाठी आलुदम ना कि पोटोल पोस्तो ना कि छानार दालना ? ........ छोलार दाल नारकोल दिये कोरा होबे ना कि मूग दाल? आर  भाजा ते कि? – बेईगुनी ना कि झुर्झुरे आलू भाजा? ......आमेर टोक ना कि टोमटो – खजुरेर चटनी? ........ मिष्टीते कि? (गोड काय?)..........माल्पोवा ना कि रशमालाई? लुची ( पुरी) नई? ........पुलाव होबे ना?
बऱ्याच चर्चा , वाद – प्रतिवाद यानंतर  शेवटी आमचा  या  पोईला बैशाक चा मेनू ठरला आहे. त्यासाठी तयारी ही सुरु झालीय. तुम्हाला ही पोईला बैशाक च्या निमित्ताने पोट पूजेचे नवीन प्रकार शिकायचे असतील तर  काही अडचण नाही येऊ नये यासाठी तर हा प्रयत्न. भापा इलिश


मेनूत भापा इलीश असावा कि नाही यावर वर साधारणतः बंगाली लोकांत दुमत होत नाही. भले इलीश कोणता आवडतो – म्हणजे- कोलाघाटचा कि गंगा नदीतला कि आणखी कुठचा यावर त्यांची मते वेगवेगळी असू शकतात. इलीशला खूप बारीक बारीक काटे असल्यामुळे सर्वांनाच ( नॉन बंगाली ) तो नीट खाणे जमेल असे नाही. शिवाय मोहरीचा स्वाद ही कित्येकांना खूप उग्र वाटू शकेल. पण एकदा तरी मासे आवडणाऱ्या लोकांनी ही आल टाइम फेवरीट बंगाली डेलिकसी ट्राय करायला हरकत नाही.

साहित्य:
हिलसा (इलीश)– ४/५ तुकडे ( गंगा नदीतला मिळाला तर सर्वात उत्तम !)
मोहरीची  डाळ – ४ – ५ मोठे चमचे / सन राइज रेडीमेड पावडर – २ चमचे
हिरवी मिरची – २/३ (तिखटाच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमीजास्त करावे.)
खसखस – १ छोटा चमचा ( वाटले तर)
मोहरीचे (सरसो) तेल – २/३ छोटे चमचे
हळद – १/२ मोठा चमचा
मीठ – चवीनुसार
कृती:
हिलसा माशाचे ४/५ तुकडे (पोटाकडचे) धुवून घ्यावे. हळद मीठ लावून ठेवावे. मोहरीची डाळ (साल काढलेली) खसखस , हिरवी मिरची, हळद, मीठ मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात माशाचे तुकडे घेऊन त्याला हे वाटण लावावे. (जर सन राइज रेडीमेड पावडर मिळाली तर काम खुपच सोपे होईल.) वरून मोहरीचे तेल सोडावे. फोईल लावून  कुकरमध्ये ठेवावे. भांड्यावर झाकण ठेवावे. नाहीतर पाणी शिरेल. एका शिट्टीत बंद करावे. गरम भाताबरोबर सर्व्ह करावे.
यातला कच्च्या मोहरीच्या तेलाचा वास आणि वाटणाचा घशात लागणारा स्वाद यासाठी बंगाली लोक वेडे होतात .

छोलार डाल नारकोल दिये

ही डाळ म्हणजे वेजिटेरीअन लोकांसाठी स्पेशल ट्रीट! लग्न, पूजा, नव वर्ष अशा महत्वाच्या प्रसंगी ही डाळ हमखास हवीच. मला तर मुळात खोबरे आवडते – त्यात तूप आणि गरम  मसाल्याच्या वासाने मन कसे तृप्त होते. सुक्या लाल मिरच्यांचा वास पण मस्त वाटतो. माझ्या आवडीच्या बंगाली पदार्थांपैकी हा एक नक्कीच. पण जरा जपून. कधी कधी पचायला कदाचित थोडा कठीण होऊ शकतो.

साहित्य:
हरबरा  डाळ – १ वाटी
ओल्या नारळाचे पातळ काप – १/४ वाटी
अख्खा गरम मसाला – ३-४ लवंग, १/२ इंच दालचिनी ,२-३ तमालपत्र
इलायची पूड – १ छोटा चमचा  
साजूक तूप – २ चमचे
जिरा – १ चमचा
लाल मिरची – २/ ३  
हळद – १/४ चमचा
साखर – १ मोठा चमचा
मीठ – चवीनुसार
काजू / किसमिस/ बदामाचे काप  – आवडीनुसार
कृती:
रात्रभर हरबरा डाळ भिजवून ठेवावी. सकाळी ते पाणी बदलून हळद मीठ घालून कुकरमध्ये ठेवावी. मऊसूद शिजली की उतरवावी. बोटचेपी डाळ तशीच ठेवावी.  घोटू नये . ओल्या नारळाचे पातळ पातळ काप करून घ्यावेत. कढईत तूप घालून जिरा व अख्खा गरम मसाला व लाल मिरची फोडणीस घालावी. नारळाचे काप घालून तांबूस होईस्तोवर परतवून घावे. त्यात शिजलेली डाळ, साखर, हवे असल्यास आणखी थोडे मीठ  घालून सारखे करून घ्यावे. गरजेप्रमाणे थोडे पाणी घालून ढवळावे. चांगली उकळी आली की इलायची पूड आणि काजू / किसमिस घालून उतरवावे. लुची (बंगाली पुरी) किवा गरम गरम भाताबरोबर खायला घ्यावे.
(Bhaapa Ilish image from: http://2.bp.blogspot.com/-KrJsAujltAM/T4pc8rXhCzI/AAAAAAAAAB4/DM9ytHyy-UU/s320/BhapaIlish1-1.jpg)