थोडेसे या ब्लॉगविषयी !
मी मुळची मराठी. मराठी मातीत जन्मले, वाढले, शिकले. महाराष्ट्राच्याच परिघात सारे नातेवाईक त्यामुळे माझ्या बालपणी मराठी जेवणाशिवाय दुसरे काहीच  माहित नव्हते. पण मग उच्च शिक्षणसाठी मुम्बईला गेले, तिथे एका बंगाली तरुणाच्या प्रेमात पडून लग्न केले आणि मग सगळी  परिस्थिती बदलली. आयुष्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र सोडून बाहेर पडले आणि बिहार – बंगालच्या सीमेवर असलेल्या जमशेदपूरला घर मांडले. नव्या नवलाईचा संसार सुरु झाला आणि स्वयंपाकची  गमभन गिरवायलाही  सुरुवात झाली.
अगदी साग्र संगीत नसला तरी भूक भागविण्यापुरता मराठी पध्दतिचा स्वयंपाक येत होता. पण या नव्या घरात आता त्याचा फारसा उपयोग नव्हता.
माझ्या सासरची मंडळी  म्हणजे बंगाली कायस्थ – तेही फार वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आलेले पूर्व बंगीय. मूलतः पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक असणारे ते पश्चिम बंगीय आणि आताच्या बांगलादेशातून भारतात आलेले ते पूर्व बंगीय. अगदी टिपिकल बंगाली भाषेत सांगायचे तर बांगाल.  पूर्व बंगीय - पश्चिम बंगीय यांच्यात तर फार पूर्वीच्या काळी रोटी बेटी व्यवहारही   होत नसत. त्यांच्या आवडीनिवडीत आणि स्वयंपाकच्या पधद्तीत ही बरेच फरक. म्हणजे पूर्व बंगीय लोकांना इलिश मासा म्हणजे पर्वणी तर पश्चिम बंगीय साधारणपणे चींगडी म्हणजे कोळंबीवर जीव ओवाळून टाकणार. पूर्व बंगीय तिखट – मसालेदार खाणारे तर पश्चिम बंगीयांच्या स्वयंपाकात जाणवेल इतकी गोडसर चव हवीच. आपल्याकडे जसे एके काळी देशस्थ – कोकणस्थ विभाजन होते तसाच काहीसा प्रकार म्हणा ना . देशस्थ – कोकणस्थ तात जसे एकमेकांना टोमणे मारण्याची सवय असते तसेच काहीसे  या दोघांत ही असते.  आता स्वयंपाकात पूर्व बंगीय - पश्चिम बंगीय यात सर्रास लग्ने होतात. माझ्या सासरीही ही सरमिसळ आहेच.  प्रत्येक जण आपापली खाद्य संस्कृती जीवापाड जपतो आणि कोणाची खाद्य संस्कृती यावर तावातावाने वाद घालताना दिसतो. असे कितीतरी  वाद होताना मी बरेचदा ऐकले आहेत आणि त्रयस्थ म्हणून दोन्ही बाजू सावरण्याचा फुका प्रयत्न ही केलेला आहे.
तर सांगायचं मुद्दा असा की , लग्नानंतर माझ्या वर जे स्वयंपाकाचे संस्कार झाले ते मुख्यतः. पूर्व बंगीय होते. त्यामुळे अर्थातच  इथे दिलेल्या बहुतेक रेसिपीज त्याच वळणावर जाणाऱ्या  आहेत. शिवाय आपल्याकडे जसे घराघरात प्रत्येक पदार्थावर त्या घराचा एक विशिष्ट शिक्का असतो त्याप्रमाणे माझ्या रेसिपीज वर घोष घराचा स्पष्ट शिक्का आहे.

मराठी आणि बंगाली स्वयंपाकात काही गोष्टी सारख्या आहेत तर बऱ्याचशा  गोष्टीत जमीन आस्मानाचा फरक आहे. म्हेरी भाजीत थोडी साखर/गूळ घालायची सवय होती पण  मोहरी आणि खसखस मसाल्यात वापरणं कधी माहीतच नव्हत. भाज्या आणि मासे एकत्र शिजवणे ! काय रे बाबा एकेक नवनवीन च प्रकार.   पण शिकायची आणि करायची हौस जबरदस्त! त्यामुळे सासू – जावा - शेजारणी यांच्याकडून नवनवीन पदार्थ शिकून घरच्यांना खाऊ घालण्याचा सपाटा सुरु झाला आणि मग चुकत माकत शिकता शिकता मी कधी एक्सपर्ट  झाले ते कळलेच नाही. साधारण पणे सर्वच बंगाली लोक आणि विशेषतः माझ्या सासरची मंडळी म्हणजे पक्के खवय्ये....म्हणजे अगदी खाण्यासाठी जगणारे ! त्यामुळे त्यांना वेगवेगळे  पदार्थ करून खाऊ घालण्याच्या नादात माझा रेसिपी चा संग्रह वाढतच गेला आणि “ खूब भालो रांना कोरे!” ( खूप चांगला स्वयंपाक करते) अशी प्रशंसा पदरी पडू लागली.
बघता बघता पंधरा वर्षे उलटली.  आम्ही जमशेदपूरची नोकरी  सोडून पुण्याला आलो. आता पुण्यात नवीन आल्यावर जुन्या मित्र मेत्रिणी, नातेवाईक यांना घरी बोलावणे ओघानेच आले. निमंत्रण करताच फरमाइश होऊ लागली ती बंगाली जेवणाची!  जेवण झाले कि मग आवडलेल्या पदार्थाची “रेसीपी  लिहून दे” असा आग्रहहि होऊ लागला. “अग, ते मुग दाळीच वरण नव्हता का केलास, दुधी भोपळा घालून,  ती  रेसिपी  हवी होती, .....अग, त्या मोहरी मसाल्याच्य फिश ची  पण रेसिपी हवी होती......!” यादी  वाढतच होती. मनात विचार केला ... असे प्रत्येकाला वेगवेगळे लिहून देत बसण्यापेक्षा या सर्व रेसिपीज एकत्र लिहून काढल्या तर ? सर्वांच्या उस्सुकतेला प्रतिसादही देता येईल आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच रेसिपी लिहीत बसाव्या लागणार नाहीत. शिवाय इतर अनेकांनाहि याचा लाभ घेता येईल. पण कामाच्या गडबडीत मनातला हा विचार प्रत्यक्षात उतरायला वेळच नव्हता.
 मध्यंतरी, माझ्या एका मोठ्या आजारपणामुळे मला काही दिवस घरी बसावे लागले. अर्थातच मला विश्रांती देण्यासाठी माझी धाकटी मुलगी मला विचारत स्वयंपाक करायला शिकु लागली. तेव्हा पुन्हा एकदा हा लिहिण्याचा विचार बळावला आणि सरते शेवटी प्रत्यक्षात उतरला तो या ब्लॉगच्या रुपाने - उशीर का होईना सुरुवात झाली  हे ही नसे थोडके!
यातल्या बहुतेक रेसिपीज अगदी रोजच्या जेवणातल्या घरगुती आहेत. सणासुदीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या स्पेशल रेसिपीज वेगळ्या भागात देण्याचा मानस आहे. बंगाली स्वयंपाकला लागणारे बरेचसे घटक आपल्या मराठी स्वयंपाकासारखेच असले तरी काही घटक टिपिकल मराठी माणसांसाठी नवीन आहेत. त्यामुळे त्याबद्दलही थोडी माहिती देण्याचा विचार आहे.  बंगाली स्वयंपाकाच्या काही पध्दती तसेच ताट वाढण्याच्या लकबी बऱ्याच वेगळ्या आहेत. म्हणून त्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे. या खेरीज काय हवे आहे ते तुम्ही कळवलेत की ते नक्कीच लक्षात ठेवीन. रेसिपिंना लागणारे बहुतेक जिन्नस महाराष्ट्रात मिळतात. अर्थात काही टिपिकल पदार्थ म्हणजे खजूरेर गूड म्हणजे खजूर गुळ, किंवा रांधूनि या साठी थोडी फार शोधा शोध करावी लागेल. मोहरी मसाला करणे  थोडे कोश्ल्याचे काम आहे. पण हल्ली तर सनराइज मस्टर्ड पावडर रेडीमेड मिळते. पुण्यात काही बंगाली मिठाई वाल्याच्या दुकानात या गोष्टी बहुतेक वेळा उपलब्ध असतात. बंगाली प्रकारचे नदीतले  माशे पण पुण्यात तर नक्कीच मिळतात फक्त ते ओळखता यायला हवेत.
यातल्या बहुतांशी रेसिपीज मी माझ्या सासरच्या महिलां वर्गाकडून शिकले आहे. त्या सर्वांमुळे हा ब्लोग लिहिणे मला शक्य झाले आहे – त्या सर्वांचेच  मनापासून खूप खूप आभार!
चला तर मग , लागुया स्वयंपाकाला ! 

No comments:

Post a Comment