पश्चिमेकडून -------------------------------------------------------पूर्वेकडे
महाराष्ट्र पश्चिमें कडचे प्रगत राज्य तर पश्चिम बंगाल भारताच्या पूर्वेला असलेले एक महत्वाचे
राज्य. मराठी माणूस शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करणार तर बंगाली लोक रविंद्रनाथ टागोर व सत्यजित रे यांना पूजणार. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीची धूम तर बंगाल मध्ये दुर्गा पूजाचा जल्लोष ! रशगुल्ला आणि शोन्देश साठी
प्रसिद्ध असणारे आणि साध्या ममता दीदी मुळे
रोज बातम्यात असणारे हे बंगाली !
मराठी आणि बंगाली संस्कृतीत आणि माणसात तसे बरेच साम्य आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील बरेचसे नेते बंगाल आणि महाराष्ट्रातूनच आलेले दिसतात.
–इकडे टिळक, आगरकर, सावरकर वगेरे आणि
नेताजी, बिपिंनचंद्र पाल, खुदीराम बोस आणि इतर.
दोघांनाही नाटक, संगीत, नृत्याची आवड असते. इकडे छबिल्दास, लागू, पालेकर
वगेरे आणि तिकडे शंभू मित्रा,
अपर्णा सेन,वगेरे! दोन्हीकडे शिक्षणाला अतिशय महत्व देतात. मुलगा एकदा का सरकारी
नोकरीत चिकटला की मायबाप धन्य होतात. धोका पत्करण्याची वृत्ती आणि पर्यायाने
व्यावसायिक दोन्हीकडेही तसे कमीच. साधरणपणे दुसऱ्या संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टीकोन आदराचा - या आणि अशा बऱ्याच समान जीवन मूल्यामुळे सासरच्या मंडळीशी जुळवून घेताना तसा फारसा त्रास झाला नाही. पण
लग्नानंतर जेव्हा बंगाली खाद्य
संस्कृतीचा परिचय झाला आणि साहजिकच माझ्या मराठी खाद्य संस्कृतीशी त्याची तुलना
झाली; तेव्हा इथे मात्र साम्यापेक्षा फरकच ज्यास्ती जाणवले.
महाराष्ट्रात – विशेषतः ज्या घाटावर मी लहानाची मोठी झाले
त्या मराठी जेवणात आणि लग्नानंतर पदरी पडलेल्या बंगाली जेवणात खुपच जास्त फरक!
खरे तर माझ्या माहेरी ही तशी थोडीफार खिचडी होतीच.कारण आई देशस्थ ब्राम्हण तर वडील कोकणी मराठा. पण तरीही घरी मुख्यत्वे करून देशस्थ
ब्राम्हणी पद्धतीचा स्वयंपाक असायचा. त्याला करणे दोन- एकतर आम्ही घाटावर राहिलो-
आणि दुसरे म्हणजे माझे वडील म्हणजे टिपिकल प्रोफेसर होते. त्यांना
खाण्यापिण्यात अजिबात रस नसायचा. पुस्तके, लिखाण वाचन हे आणि एवढेच काय ते महत्वाचे त्यामुळे “ खाणे- पिणे हे केवळ जगण्यासाठी! ”
"जगण्यासाठी खाणे " एवढे साधे तत्व असणाऱ्या या अशा घरातून मी “खाण्यासाठी जगणे, नव्हें,
खाण्याभोवती सारा दिवस घालवणाऱ्या” घरी येवून पडले आणि सुरुवातीला अतिशय अवघडलेली मी हळू हळू त्यात कधी रुळले हे कळलेच नाही.
घाटावर चे ब्राम्हणी जेवण म्हणजे मुख्यत्वे पोळी, भाकरी,
आमटी, भाजी, वगेरे... भात नावापुरताच! तर पारंपारिक बंगाली जेवणात भात हा मुख्य
घटक. आपण भात कसा मउ करणार तर भात शिडशिडीत नाही झाला तर बंगाली लोक नाके मुरडणार! आपल्याकडे डाव्या बाजूला लोणची-
पापड, कोशिंबीर हवेच तर बंगाली जेवणात त्याला फारसे महत्व नाही. लसणाचा
वापरही महाराष्ट्रात ब्राम्हणी जेवणात होतो त्यापेक्षा खूप कमी. बंगाली जेवणात कांदा,
जीरा , आले , याखेरीज मोहरी, खसखस यांचा ही मसाल्यासाठी बराच वापर होतो. आपल्या पेक्षा मिश्र
भाज्या खाण्याची, साली- देठ वापरण्याची
प्रथा तिकडे फारच जास्त! आपण शेंगदाणा नाहीतर करडईचे तेल वापरणार तर ह्यांना मोहरीचे
तेल हवे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात
पोळी, भाकरी वगेरे सहसा खात नाहीत. रोटी –सब्जी खायची तर सकाळच्या नाश्यात किंवा थंडीच्या
दिवसात रात्रीच्या जेवणात. एरवी दुपारच्या
आणि रात्रीच्या जेवणात मुख्यत्वे करून भातच! भाता बरोबर खाण्यासाठी साधारणपणे पाच – सहा मुख्य प्रकार असतात. आपल्याकडे
बरेच शाकाहारी आढळतात पण तिकडे शाकाहारी शोधावे लागतात. निरामिष जेवण म्हणजे
कांदा- लसुण न घालता केलेला शाकाहारी स्वयंपाक. बहुतेक बंगाली घरात गुरुवारी
निरामिष जेवण असते. त्या व्यतिरिक्त मग पूजा अर्चा असेल किंवा इतर कारणानेही
निरामिष जेवण असू शकते. पण बाकी दिवशी एका वेळेला तरी मासे हवेतच. मांसाहारातही
आपल्याकडे कोंबडी – मटण जास्त प्रिय तर तिकडे कोंबडी – मटण आठवड्यातून एकदा – साधरणपणे
रविवारी. रोजच्या घडीला माशांना पर्याय नाही. बरे माशांत ही फरक – आपले कोकणी लोक समुद्रातले
व खाडीतले मासे खाणार तर हे बंगाली लोक नदीतले मासे शोधणार. बंगाली मासे करायला शिकण्याआधी
हे लोक मासे कोणते खातात आणि ते कसे ओळखायचे ते माहित असायला हवे – त्यासंबंधी सांगेन
लवकरच !
No comments:
Post a Comment